Ad will apear here
Next
विदुरनीती - भाग ८


पञ्चाग्नयो मनुष्येण परिचर्या: प्रयत्नत:। 
पिता माताग्निरात्मा च गुरुश्च भरतर्षभ ।। वि. १.७९।।

अर्थ : हे भरतश्रेष्ठा! अग्निरूप असणाऱ्या पिता, माता, अग्निहोत्र, आत्मा आणि गुरू या पाचांची मनुष्याने प्रयत्नपूर्वक सेवा केली पाहिजे. 

पञ्चैव पूजयंल्लोके यश: प्राप्नोति केवलम् । 
देवान् पितृन् मनुष्यांश्च भिक्षूनतिथिपञ्चमान् ।। वि. १.८०।।

अर्थ : देवता, वडीलधारी व्यक्ती, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती, संन्यासी व अतिथी या पाच जणांचा आदर आणि सन्मान करणारा मनुष्य जगात कीर्ती मिळवतो. 

 पञ्चेन्द्रियस्य मर्त्यस्यच्छिद्रं चेदेकमिन्द्रियम्। 
 ततोऽस्य स्रवति प्रज्ञा दृते: पात्रादिवोदकम् ।। वि. १.८२।।

अर्थ : पाच इन्द्रियांपैकी एका इन्द्रियामध्ये जरी दोष उत्पन्न झाला, तरी त्या मनुष्याची बुद्धी, भोके असलेल्या भांड्यातून पाणी जसे वाहून जाते त्याप्रमाणे नष्ट होते. 

षड् दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता। 
निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ।। वि. १.८३।।

अर्थ : कल्याण होण्याची इच्छा असणाऱ्या माणसाने झोप, डुलकी काढणे, भीती, क्रोध, आळस आणि लवकर होणाऱ्या कामात वेळ काढणे या सहा दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे. 

षडेव तु गुणा: पुंसा न हातव्या: कदाचन । 
सत्यं दानमनालस्यमनसूया क्षमा धृति:।। वि. १.८६।।

अर्थ : माणसाने कधीही सत्यभाषण, दान देणे, सतत काम करणे, असूया न बाळगणे, क्षमाशीलता आणि धैर्य या सहा गुणांचा त्याग करू नये. 

षण्णामात्मनि नित्यानामैश्वर्यं योऽधिगच्छति । 
न स पापै: कुतोऽनर्थैर्युज्यते विजितेन्द्रिय:।। वि. १.८८।।

अर्थ : काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या मनात राहणाऱ्या सहा शत्रूंवर विजय मिळवतो असा जितेंद्रिय मनुष्य कधीही पापांना जवळ येऊ देत नाही त्यामुळे मग त्यापासून त्याला कष्ट कसे बरे होणार? 

आरोग्यमानृण्यमविप्रवासः
सद्भिर्मनुष्यैः सह सम्प्रयोगः ।
स्वप्रत्यया वृत्तिरभीतवासः
षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ।। वि. १.९४।।

अर्थ : (आता विदुर धृतराष्ट्राला ह्या मनुष्य लोकातील सहा सुखे कोणती ते सांगतो आहे.) निरोगी राहणे, ऋण न घेणे अर्थात कोणाचाही ऋणी न होणे, अन्य देशात न राहाणे, चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहणे, आपल्या उपजीविकेच्या साधनांनी आपला चरितार्थ चालवणे आणि निर्भयपणे जगणे ही ती सहा सुखे होत. 


ईर्ष्यी घृणी न सन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदुःखिताः ।। वि. १.९५।।

अर्थ : दुसऱ्याशी स्पर्धा करणारा म्हणजेच ईर्ष्या करणारा, घृणा म्हणजेच तिरस्कार करणारा, असंतुष्ट, रागावणारा, नेहमी शंका घेणारा अर्थात संशयी आणि दुसऱ्याच्या भाग्याच्या भरवशावर जीवन व्यतीत करणारा असे सहा प्रकारचे लोक नेहमी दुःखी राहतात. 

सप्त दोषाः सदा राज्ञा हातव्या व्यसनोदयाः ।
प्रायशो यैर्विनश्यन्ति कृतमूला अपीश्वराः ।। वि. १.९६।।
स्त्रियोऽक्षा मृगया पानं वाक्पारुष्यं च पञ्चमम् ।
महश्च दण्डपारुष्यमर्थदूषणमेव च ।। वि. १.९७।।

अर्थ : या श्लोकांमध्ये संकटाला कारणीभूत होणारे सात दोष सांगितले आहेत. स्त्रीविषयक आसक्ती, जुगार, शिकार, मद्यपान, कठोर बोलणे, अतिशय कठोर दंड देणे आणि संपत्तीचा दुरुपयोग करणे हे ते सात दोष होत. विदुर सांगतो, की या सात दोषांमुळेच भले भले राजे राज्य गमावून नष्ट होतात. विदुरनीतीत विदुराने द्यूताची सर्वतोपरी निंदा केली आहे. येथेही ‘अक्षाः’ अर्थात फासे अर्थात जुगार हा महान दोष सांगितला आहे. 

अष्टौ गुणाः पुरुषं दीपयन्ति
प्रज्ञा च कौल्यं च दमः श्रुतं च ।
पराक्रमश्चाबहुभाषिता च
दानं यथाशक्ति कृतज्ञता च ।। वि. १.१०४।।

अर्थ : या श्लोकात मनुष्याला देदीप्यमान कीर्ती प्राप्त करून देणारे आठ गुण सांगितले आहेत. बुद्धी, कुलीनता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, पराक्रम, अधिक न बोलणे, यथाशक्ती दान देणे आणि कृतज्ञता हे ते आठ गुण होत. 

नवद्वारमिदं वेश्म त्रिस्थूणं पञ्चसाक्षिकम् ।
क्षेत्रज्ञाधिष्ठितं विद्वान् यो वेद स परः कविः ।। वि. १.१०५।।

अर्थ : या श्लोकात ज्ञानी मनुष्याचे लक्षण सांगितले आहे. जो मनुष्य डोळे, कान इत्यादि नऊ द्वारे असलेल्या, वात, पित्त आणि कफरूपी तीन खांब असलेल्या, ज्ञानेंद्रियरूपी पाच साक्षीदार असलेल्या आणि आत्म्याचे अधिष्ठान असलेल्या ह्या देहरूपी घराचे स्वरूप जाणतो तो महाज्ञानी होय. 

दश धर्मं न जानन्ति धृतराष्ट्र निबोध तान् ।
मत्तः प्रमत्तः उन्मत्तः श्रान्तः क्रुद्धो बुभुक्षितः ।। वि. १.१०६।।
त्वरमाणश्च लुब्धश्च भीतः कामी च ते दश ।
तस्मादेतेषु सर्वेषु न प्रसज्जेत पण्डितः ।। वि. १.१०७।।

अर्थ : विदुर धृतराष्ट्राला सांगतो, की हे राजा, दहा प्रकारची माणसे धर्म जाणत नाहीत. व्यसनाधीन असलेला, सावधान नसलेला, वेडा, थकलेला, रागावलेला, भुकेलेला, उतावीळ, लोभी, भयभीत झालेला आणि कामातुर झालेला, असे ते दहा होत. विद्वान मनुष्याने ह्या दहा प्रकारच्या लोकांच्या फार जवळ जाऊ नये, असा उपदेश या श्लोकात केला आहे. 

यः काममन्यू प्रजहाति राजा
पात्रे प्रतिष्ठापयते धनं च ।
विशेषविच्छ्रुतवान् क्षिप्रकारी
तं सर्वलोकः कुरुते प्रमाणम् ।। वि. १.१०९।।

अर्थ : जो राजा काम आणि क्रोध यांचा त्याग करतो आणि सत्पात्री दान करतो, विशेष गोष्टी जाणणारा आणि बहुश्रुत आहे, शास्त्रांचा जाणकार आहे आणि कर्तव्यतत्पर आहे अशा राजाला सर्व जण प्रमाण मानतात आणि त्याचे अनुकरण करतात. ‘महाजनो येन गतः स पन्थाः’ या उक्तीचा येथे प्रत्यय येतो. 

जानाति विश्वासयितुं मनुष्यान् 
विज्ञातदोषेषु दधाति दण्डम् ।
जानाति मात्रां च तथा क्षमां च
तं तादृशं श्रीर्जुषते समग्रा ।। वि. ११०।।

अर्थ : जो राजा प्रजेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी समर्थ असतो, जो राजा अपराध सिद्ध झाल्यावर अपराधी माणसाला शासन करतो, अपराधानुसार क्षमा करणे किंवा दंड देणे जो जाणतो अशा राजाला सर्व संपत्ती प्राप्त होते. 

सुदुर्बलं नावजानाति कश्चिद्
युक्तो रिपुं सेवते बुद्धिपूर्वम् ।
न विग्रहं रोचयते बलस्थै:
काले च यो विक्रमते स धीर: ।। वि. १११।।

अर्थ : जो दुर्बल माणसांचा कधीही अपमान करत नाही, जो नेहमी सावध राहून शत्रूबरोबर बुद्धीचा वापर करून व्यवहार करतो, आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली असणाऱ्यांशी युद्ध किंवा भांडण करत नाही, परंतु वेळ आल्यावर जो पराक्रम दाखवतो, तोच खरा ‘धीर पुरुष’ म्हटला जातो. 

अनर्थकं विप्रवासं गृहेभ्य:
पापै: सन्धिं परदाराभिमर्शम् ।
दम्भं स्तैन्यं पैशुनं मद्यपानं
न सेवते यश्च सुखी सदैव ।। वि. ११३।।

अर्थ : जो मनुष्य कारण नसताना प्रवास करीत नाही, पापी लोकांशी संबंध ठेवीत नाही, परस्त्रीगमन करीत नाही, दांभिकता, चोरी, चुगली आणि मद्यपान करीत नाही, तो नेहमी सुखी राहतो. 

न संरम्भेणारभते त्रिवर्गमाकारित: शंसति तत्त्वमेव ।
न मित्रार्थे रोचयते विवादं
नापूजित: कुप्यति चाप्यमूढ: ।। वि. ११४।।
न योऽभ्यसूयत्यनुकम्यते च
न दुर्बल: प्रातिभाव्यं करोति ।
नात्याह किञ्चित्क्षमते विवादं
सर्वत्र तादृग् लभते प्रशंसाम् ।। वि. ११५।।

अर्थ : जो बुद्धिमान मनुष्य अहंकाराने किंवा गर्वाने धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थांची सुरुवात करीत नाही. कुठलीही गोष्ट विचारल्यावर त्यासंबंधी जे योग्य आहे, तेच बोलतो. बारीकसारीक गोष्टींवरून जो भांडण करीत नाही, योग्य तो मानसन्मान न मिळाल्याने रागावत नाही, जो मनुष्य ईर्ष्या किंवा द्वेष न करता सर्वांवर नेहमी दयाच करतो, जो दुबळेपणा दाखवून कुणाला विरोध करीत नाही, जो क्षणभरही व्यर्थ वादविवाद करीत बसत नाही अशा माणसांची नेहमी सर्वत्र प्रशंसाच होते. 

यो नोद्धतं कुरुते जातुं वेषं
न पौरुषेणापि विकत्थतेऽन्यान्।
न मूर्च्छित: कटुकान्याह किञ्चित्
प्रियं सदा तं कुरुते जनो हि ।। वि. ११६।।

अर्थ : जो स्वतःला न शोभणारा वेष घालीत नाही, दुसऱ्यांसमोर आपला पराक्रम सांगत नाही, राग आला तरी कटुवचन बोलत नाही, अशा माणसावर नेहमी सर्व लोक प्रेम करतात. 

न वैरमुद्दीपयति प्रशान्तं
न दर्पमारोहति नास्तमेति।
न दुर्गतोऽस्मीति करोत्यकार्यं
तमार्यशीलं परमाहुरार्या: ।। वि. ११७।।

अर्थ : शांत झालेल्या वैराला जो पुन्हा उद्दीपित करीत नाही, जो कधीही गर्व करीत नाही, जो स्वतःला हीन समजत नाही, तसेच ‘मी संकटात सापडलो’ असे खोटेच सांगून जो चुकीचे काम करत नाही, अशा उत्तम आचरण असणाऱ्या पुरुषाला सत्प्रवृत्तीचे लोक सर्वश्रेष्ठ समजतात. 

न स्वे सुखे वै कुरुते प्रहर्षं
नान्यस्य दु:खे भवति प्रह्रष्ट:|
दत्त्वा न पश्चात्कुरुतेऽनुतापं
स कथ्यते सत्पुरुषार्यशील: ।। वि. ११८।।

अर्थ : जो आपल्या सुखाने आनंदी होत नाही, जो दुसऱ्याच्या दु:खाने आनंदी होत नाही आणि जो दान दिल्याने पश्चात्ताप करीत नाही, अशा मनुष्याला सत्पुरुष आणि सदाचारी समजले जाते. 

(विदुरनीती समाप्त)

- नारायणी शहाणे (एमए - प्रथम वर्ष), आशिष अनिल आठवले, रेणुका सदानंद भडभडे (एमए - द्वितीय वर्ष)
संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

(सौजन्य : रत्नागिरी न्यूज नेटवर्क)

(विदुरनीतीचे आधीचे भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ETZPCW
Similar Posts
विदुरनीती - भाग ६ अकामान् कामयति यः कामयानान् परित्यजेत् । बलवन्तं च यो द्वेष्टि तमाहुर्मूढचेतसम् ।। वि. १.३७।।
विदुरनीती - भाग ७ एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः। भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्ता दोषेण लिप्यते।। वि. १.४७।।
विदुरनीती - भाग १ व्यासरचित महाभारतातील पाचव्या पर्वाचे नाव उद्योगपर्व. या पर्वातील एक उपपर्व म्हणजे प्रजागरपर्व. या प्रजागरपर्वाचाच एक भाग विदुरनीती या नावाने प्रसिद्ध आहे. महाभारत युद्धापूर्वी विदुराने धृतराष्ट्राला राजधर्माचा उपदेश केला. हाच उपदेश नंतरच्या काळात ‘विदुरनीती’ या नावाने प्रसिद्ध झाला. राजधर्माचे सुंदर निरूपण यामध्ये केले आहे
विदुरनीती - भाग २ व्यासरचित महाभारतातील पाचव्या पर्वाचे नाव उद्योगपर्व. या पर्वातील एक उपपर्व म्हणजे प्रजागरपर्व. या प्रजागरपर्वाचाच एक भाग विदुरनीती या नावाने प्रसिद्ध आहे. महाभारत युद्धापूर्वी विदुराने धृतराष्ट्राला राजधर्माचा उपदेश केला. हाच उपदेश नंतरच्या काळात ‘विदुरनीती’ या नावाने प्रसिद्ध झाला. राजधर्माचे सुंदर निरूपण यामध्ये केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language